सांगलीचे व्यवस्थापन प्रवीण परदेशी पाहणार - मुख्यमंत्री

पूरस्थितीत बाधित झालेल्या नागरिकांना प्रतिकुटुंब रोखीने पाच हजार अर्थसाहाय्य तातडीने वितरित करा, तसेच उर्वरित रक्कम बॅंक खात्यात जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सांगलीतील पूर परिस्थितीत व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची नियुक्ती केली आहे. परदेशी यांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा अनुभव असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विश्वासू अधिकाऱ्याची निवड या मोहिमेवर केली आहे. 
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये एटीएमची व्यवस्था पूर्ववत केली जावी यासाठी रिझर्व्ह बॅंक आणि एसबीआयला राज्य सरकारने विनंती केली आहे. 
मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. या वेळी मुख्य सचिव अजोय मेहता, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर, माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह, मंत्रालय नियंत्रण कक्षाचे सहसचिव अरुण उन्हाळे, आपत्ती निवारण प्रभागाचे संचालक अभय यावलकर उपस्थित होते.

More videos

See All