राजीव सातव यांच्या आठवणीत कुणाल राऊत झाले भावूक!

हिंगोली-- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष पदाचे उमेदवार कुणाल राऊत हे आज कळमनूरी येथे आले असता काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते राजीव सातव यांच्या आठवणीने  भावूक झाले. राजीव सातव यांच्या पत्नी आणि आमदार डॉ.प्रज्ञा सातव यांची त्यांनी भेट घेतली तेव्हा आठवणीचा गहिवर दाटून आला.
कुणाल राऊत यांनी आज हिंगोली येथे भेट दिली तेव्हा त्यांनी कळमनूरी येथे दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्यांच्या समाधी स्थळाला सपत्नीक भेट देऊन त्यांना विनम्र अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी सातव यांच्या पत्नी आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी सातव यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेत राजीव सातव यांच्या आठवणीने त्यांचे डोळे भरून आले.
"आम्ही सर्व राजीव सातव यांच्या टीमची मूल आहोत. ते माझे मार्गदर्शक होते. त्यांच्यामुळे मी राजकारणात आलो,त्यांनीच मला घडवले. मला युवक काँग्रेसमध्ये पुढे आणण्याचे कामही त्यांनीच केले. त्यांनी दिल्लीत आयोजित केलेला बुनियाद कार्यक्रमाला आम्ही उपस्थित होतो. चंद्रपूर येथे एका गावात त्यांनी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात काँग्रेसच्या विचाराप्रमाणे तीन दिवस स्वतःची कामे स्वतःच करणे, ग्रामस्वच्छता करणे ही कामे आम्ही आवडीने केली. मी कधी चुकलो तर मला प्रेमाने ते समजावून सांगायचे आणि म्हणायचे तुला मोठे भविष्य आहे! त्यांचे अचानक जाण्याने मला खूप धक्का बसला," असे बोलतानाच त्यांचा कंठ दाटून आला. याप्रसंगी उपस्थित सर्वांनाच भावना अनावर झाल्या.
यावेळी बोलताना डॉ. प्रज्ञा सातव यांनी त्यांचे स्वागत केले आणि प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत कुणाल राऊत यांच्या पाठिशी  उभे राहण्याची ग्वाही दिली.
यानंतर सातव यांच्या कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कुणाल राऊत यांनी पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी कळमनूरी नगर परिषदेचे नगरसेवक महेसन चाऊस, निहाल कुरेशी, प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष सुमेध मुळे, उपाध्यक्ष महेंद्र जोंधळे, औंढा नागनाथचे शहर अध्यक्ष सुनील जोंधळे यांनी त्यांची भेट घेतली.
यानंतर त्यांनी माजी आमदार डॉ. संतोष टार्फे यांची त्यांच्या हिंगोली येथील निवासस्थानी भेट घेतली.
तत्पुर्वी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीरअप्पा सराफ, हिंगोली नगर परिषदेतील गट नेते नेहाल भैया, नगरसेवक अनिल नैनवानी, शेख मामुद, मिलिंद उबाळे  यांची भेट घेतली. तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते सुहास घुगे, सचिन कांबळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या  कुटूंबियांशी चर्चा केली. याशिवाय हिंगोलीच्या ग्रामीण भागाचे नेतृत्व करणारे जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते, कैलास पाटील साळुंखे, एस.पी.राठोड यांच्याशीही भेट घेऊन चर्चा केली.
हिंगोली शहरात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे माजी हिंगोली जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव वाठोरे, सोशल फोरमचे विजय कुमार कांबळे, युवक काँग्रेसचे हिंगोलीचे शहर अध्यक्ष अक्षय डाखोरे, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सुमित कांबळे, रवी कांबळे,शक्ती कांबळे, शुभम अवचार,विशाल इंगोले, स्वप्नील वाठोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
संविधान दिनानिमित्त हिंगोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी हार अर्पण केला. तसेच या ठिकाणी रक्तदान करणाऱ्या तरुणांची भेट घेऊन त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी ऍड. उल्हास पाटील,मारुती सोनोने, नामदेव सपाटे यांनी त्यांचे स्वागत केले.