पाण्यासाठी ग्रामस्थ टॉवरवर, ९२ वर्षीय आ. गणपतराव देशमुखांचेही ठिय्या आंदोलन

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची झळ मोठ्या प्रमाणात बसत असून पंढरपूर तालुक्यातील तिसंगी-सोनके गावच्या तलावात वीर धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. दोन दिवसांपासून गावातील टॉवरवर चढून ग्रामस्थांचे आंदोलन सुरु असून ग्रामस्थांच्या समर्थनार्थ शेकापचे ज्येष्ठ नेते आणि ९२ वर्षीय आमदार गणपतराव देशमुख यांनी देखील ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
यंदा राज्यात सर्वात कमी पावसाची नोंद सोलापूर जिल्ह्यात झाली आहे. याचा फटका जिल्ह्यातील गावांना बसत आहे. वीर धरणातून नीरा कालव्यातून पंढरपूर तालुक्यातील तिसंगी तलावात पाणी सोडावे या मागणीसाठी आमदार देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. या प्रश्नावर त्यांनी सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांचीही भेट घेतली होती. मात्र, पाणी सोडण्याबाबत उदासीनता दाखवण्यात आल्याने ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. परंतु प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यामुळे आमदार गणपतराव देशमुख नाराज झाले. तिसंगी-सोनके-उंबरगाव हा भाग पंढरपूर तालुक्याचा असून हा भाग आमदार गणपतराव देशमुख यांच्या सांगोला विधानसभा मतदारसंघातील आहे. शेवटी ग्रामस्थांच्या समर्थनार्थ ९२ वर्षांचे आमदार देशमुख यांनी देखील ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. आमदार गणपतराव देशमुख हे ९२ वर्षांचे वयोवृध्द नेते आहेत. ते विधानसभेवर अकराव्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत. आता तरी प्रशासन या मागणीची दखल घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

More videos

See All