रमेश कदमांचा पाय आणखी खोलात; न्यायालयात खटले दाखल करण्यास मान्यता

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांच्याविरुद्ध आणखी चार घोटाळ्यांप्रकरणी न्यायालयात खटले दाखल करण्यास राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली.
मंत्रिमंडळाचा ठराव आता राज्यपालांच्या मान्यतेसाठी पाठविला जाईल आणि त्यांनी मान्यता दिल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ‘लोकमत’ने उघडकीय आणलेल्या या घोटाळ्यांची चौकशी सीआयडी करीत आहे. त्यात आतापर्यंत विविध आरोपांखाली कदम आणि अन्य अधिकारी, कर्मचारी व खासगी व्यक्तींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
हिंगोली, सोलापूर, बीड जिल्ह्यांमधील हे घोटाळे आहेत. हिंगोलीतील घोेटाळ्यात महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक श्रावण बावणे, जिल्हा व्यवस्थापक सुग्रीव गायकवाड, लिपिक सुजित पाटील यांनाही आरोपी करण्यात आले आहे. बीडमधील घोटाळ्यात महामंडळाचे तत्कालीन जिल्हा व्यवस्थापक बापुराव नेटके, लक्ष्मण घोटमकुळे, सचिन कांबळे, श्रावण हातागळे यांच्याविरुद्धही दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
महामंडळाच्या विविध जिल्हा कार्यालयांमार्फत कोट्यवधी रुपये काढून अपहार करण्यात आला होता. केवळ हिंगोलीचेच उदाहरण घ्यायचे, तर बँक आॅफ बडोदाच्या तेथील शाखेतून ३० लाख रुपये सतनाम आॅटोमोबाइल्सच्या नावाने आरटीजीएसद्वारे हस्तांतरित झाले. बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेतून ५० लाख रुपये काढण्यात आले. महामंडळाच्या खात्यातून राजयोग आॅटोमोबाइल्सला (लातूर) १८ लाख ५० हजार रुपये वळते करण्यात आले होते.

More videos

See All