‘कुठले तिकीट हवे, ‘रेल्वे’चे की ‘एसटी’चे?’

‘‘रेल्वे’चे की ‘एसटी’चे, कुठले तिकीट हवे?’ असे विचारत पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनाच निरुत्तर करीत भाजप प्रवेशाचे खुले आमंत्रण दिले. विटा शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन देशमुख यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
देशमुख म्हणाले, की शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी, शेतकऱ्यांना मुबलक पाणी, वीज, खते, बियाणे मिळावे, यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेली ७१ वष्रे काँग्रेसने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांना केंद्रिबदू मानून काम करत आहे. ठराविक गटाला कर्ज देण्याची काँग्रेसची दृष्टनीती आहे. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार आग्रही असल्याचा विश्वास लोकांना असल्याचे सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. विटय़ाचे वैभव वाढविण्यासाठी विटा पालिका काँग्रेसमुक्त करूया. माजी आमदार पाटील यांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी अगोदर सदाशिवराव पाटील यांना भाजपने तिकीट जाहीर करावे मगच भाजप प्रवेशाचा विचार करू असे सांगताच मंत्री देशमुख यांनी ‘कुठले तिकीट हवे ‘रेल्वे’चे (लोकसभा) की ‘एसटी’चे (विधानसभा)?’ असे विचारत थेट पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिले. तसेच याच वेळी उपस्थितांना मोबाइलवर टोलफ्री क्रमांक टाइप करून कॉल करण्याचा सल्ला दिला. उपस्थितांपकी काहींनी गंमत म्हणून तो क्रमांक लावताच आपले भारतीय जनता पक्षात स्वागत असल्याचे संदेश आले.

More videos

See All