‘रिफायनरी’ला आमचा विरोधच; हिंमत असेल तर समर्थकांनी मोर्चा काढावा - नीतेश राणे

विधानसभेत कायदा सुव्यवस्था हाती घ्यावी लागली तरी चालेल, मात्र आपण रिफायनरीला विरोध करणारच. आम्ही रिफायनरीच्या विरोधात रत्नागिरी, राजापूर, देवगड येथे मोर्चा काढले. जनतेने लाखोंच्या संख्येने या मोर्चामध्ये उपस्थित राहून या रिफायनरीला आपला विरोध दाखविला आहे. त्यामुळे हिंमत असेल तर या रिफायनरीच्या बाजूने समर्थकांनी मोर्चा काढून दाखवावा, असे खुले आव्हान आमदार नीतेश राणे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिले. 
देवगड तालुका स्वाभिमानच्या कार्यालयात आमदार नीतेश राणे यांनी माहुल रिफायनरी व भविष्यात होणारी नाणार रिफायनरी या संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बाळ खडपे, तालुकाध्यक्ष संदीप साटम, नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, नगरसेवक संजय तारकर, बापू जुवाटकर, उमेश कणेरकर, ज्ञानेश्वर खवळे, उष:कला केळुस्कर, प्रीती वाडेकर, शरद ठुकरुल आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राणे म्हणाले, माहुल रिफायनरीमध्ये साडेचार हजार लोकांना नोक-या आहेत. मात्र त्या कंत्राटी पद्धतीवर आहेत. केवळ कंत्राटी पद्धतीवर नोक-या मिळविण्यासाठी कोकणचे आंबे, काजू व निसर्ग यांचा बळी द्यायचा का? असा प्रश्नही राणे यांनी केला. सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर हे नाणार रिफायनरीचे समर्थन करतात. साळगावकर हे शिवसेनेचे असून मग त्यांची ही भूमिका वैयक्तिक आहे की शिवसेनेची अधिकृत आहे. याचा खुलासा आजतागायत झालेला नाही. यामुळे शिवसेनेची भूमिका आजतागायत संशयाची राहिली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे विधानसभेत कोणतेही उत्तर देण्याचे टाळतात हे त्याचेच द्योतक आहे. या रिफायनरी प्रकल्पामुळे देवगड व कणकवलीतील जनता घाबरलेली असून आपण ग्रामपंचायतींमध्ये दिलेले नाणार रिफायनरी संदर्भातील जिल्हाधिका-यांचे पत्र पाहिले  तर तुमच्या लक्षात येईल की या भागातील व्यवहार थांबविण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत, असेही राणे म्हणाले.

More videos

See All