मराठा आंदोलकांचा शेट्टींना कुठे विरोध तर कुठे स्वागत

 मराठा समाजाच्या आंदोलनातील गटबाजी, स्थानिक संदर्भ लक्षात घेत होणारा विरोध-स्वागत आता उघड होऊ लागले आहेत. रविवारी या आंदोलनात एके ठिकाणी सहभागी होण्यासाठी गेलेल्या खासदार राजू शेट्टी यांना ‘चले जाव’चा सामना करावा लागला असताना आज दुसऱ्या ठिकाणी मात्र त्यांचे स्वागत झाले. हातकणंगले येथे  तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाच्यावतीने सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शेट्टी काल आंदोलनस्थळी गेले होते. तेव्हा स्थानिक आंदोलकांनी ‘चले जाव’च्या घोषणा देत त्यांना परतवून लावले. शेट्टी यांना झालेल्या हा विरोधाची सर्वत्र मोठी चर्चा होती. वास्तविक शेट्टी यांनी व्यक्तिश: तसेच त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. मात्र काल ते हातकणंगलेतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले असता त्यांना विरोध करण्यात आला.
हा विरोध स्थानिक राजकारणातून असल्याचे बोलले जात आहे.  दरम्यान शेट्टी आज कोल्हापूर येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले असता तिथे त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले गेले. तसेच, या वेळी त्यांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ भाषण देखील केले. शेट्टी म्हणाले, की मराठा आरक्षणाचा हा प्रश्न आपण नोव्हेंबर २०१२ मध्ये संसदेत सर्वप्रथम मांडला. आमच्या संघटनेकडूनही सुरुवातीपासून पाठिंब्याची भूमिका जाहीर केली. असे असताना काल झालेला विरोध अनाकलनीय होता.

More videos

See All