पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला धक्का; विधानपरिषद निवडणुकीत एका उमेदवाराची तडकाफडकी माघार

विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांचे समर्थक असलेल्या रमेश कराड यांना गळाला लावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोमवारी चांगलेच तोंडघशी पडावे लागले. रमेश कराड यांना भाजपातून राष्ट्रवादीमध्ये आणण्यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे या माध्यमातून धनंजय यांनी पंकजा मुंडे आणि पर्यायाने भाजपावर कुरघोडी केल्याची चर्चा होती. मात्र, अवघ्या पाच दिवसांत पडद्यामागे झालेल्या वेगवान राजकीय हालचालींनंतर रमेश कराड यांनी सोमवारी लातूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

रमेश कराडे यांनी तडकाफडकी उमेदवारी अर्ज का मागे घेतला, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, यामागे राष्ट्रवादीचा गाफीलपणा आणि पंकजा मुंडे यांचे व्यवस्थापन कौशल्य असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रमेश कराड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना शरद पवार यांच्या सांगण्यावरून अर्ज भरत आहोत, असे म्हटले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या जागेसाठी राष्ट्रवादीने परभणी-हिंगोलीची जागा काँग्रेससाठी सोडली होती. मात्र, आता रमेश कराड यांनीच माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच गोची झाली आहे. यानंतर आता राष्ट्रवादीने बंडखोर उमेदवार अशोक जगदाळे यांना चुचकारण्यास सुरूवात केली आहे. अशोक जगदाळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र, ते आता काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार असतील, असे धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने हा पर्याय नाईलाजाने स्वीकारला आहे. 
रमेश कराड हे पंकजा यांचे कट्टर समर्थक होते. मात्र, विधान परिषद निवडणुकीसाठी कराड यांना उमेदवारी देण्यात त्या उत्सुक नव्हत्या. अखेर भाजपाला जय श्रीराम करत रमेश कराड यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. राष्ट्रवादीमध्ये दाखल होताच त्यांना पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिली. दुसरीकडे पंकजा यांनी सुरेश धस यांना भाजपाकडून उमेदवारी मिळवून दिली. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार, असे दिसत होते. मात्र, रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेत राष्ट्रवादीची पंचाईत केली.

More videos

See All