पीकविम्यासाठी शिवसेनेचा मोर्चा; उद्धव आणि आदित्य ठाकरेंचाही सहभाग

पीकविमा कंपन्या या शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याने याविरोधात शिवसेनेने मुंबईतील वीमा कंपन्यांच्या कार्यालयांबाहेर मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील सहभागी झाले आहेत. एशिअन हार्ट इन्स्टिट्यूटपासून या मोर्चाला सुरुवात झाली असून बीकेसी परिसरातील भारती एक्सा या वीमा कंपनीसमोर या मोर्चाची सांगता होणार आहे. शिवसेनेचे मंत्री, पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्तेही या मोर्चात सहभागी झाले आहेत.
शिवसेनेचा हा मोर्चा शेतकऱ्यांचा मोर्चा नसून शेतकऱ्यांसाठी असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना देताना वीमा कंपन्यांकडून त्यांना त्रास दिला जातो. याचे नियम शेतकऱ्यांना विचारुन तयार करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची यामध्ये पिळवणूक होते. हे सर्व बदलले जावे यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जर या मोर्चाचा अर्थ पीकविमा कंपन्यांना कळत नसेल तर त्यांना यानंतर शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशाराही या वीमा कंपन्यांना देण्यात आला आहे.

More videos

See All